काँग्रेससोबत पुन्हा युती करणार नाही – देवेगौडा

images 7

बंगळूरू, वृत्तसंस्था | माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांनी आता आपण स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकमध्ये मध्यावधी निवडणुका होतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. “राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे, जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू,” असे देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे.

 

पुन्हा ती चूक करणार नाही, असे सांगत देवेगौडा यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. कर्नाटकमधील युतीचे सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस सतत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. यादरम्यान गुरुवारी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेससोबत युतीची चर्चा करण्यासाठी आपली दारे अद्याप खुली असल्याचं म्हटले होते, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.

बंड पुकारलेल्या १७ आमदारांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून त्याठिकाणी काँग्रेससोबत युती करत निवडणूक लढण्यासाठी आपण तयार असल्याचा सूचक इशारा देवेगौडा यांनी दिला होता. जुलै महिन्यात कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वातील सरकार कोसळल्यानंतर देवेगौडा आणि सिद्धरमय्या यांनी एकमेकांवर आरोप केले होते. सरकार पडल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमधील नेत्यांचा युती करण्याला विरोध आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी युतीचा निर्णय उच्च पातळीवर घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे. काही नेत्यांनी मात्र जेडीएससोबत युती तोडण्याच्या निर्णय अगदी योग्य असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे.

आगामी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याचा अंदाज देवेगौडा यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आपण आणि कुमारस्वामी राज्यभर दौरा करुन प्रचार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपा सरकार १७ बंडखोर आमदारांच्या मदतीने आले असून ते जास्त काळ टिकणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.

Protected Content