आंदोलकांना चिरडल्याचा निषेध : आज देशभरात निदर्शने

लखनऊ वृत्तसंस्था | उत्तरप्रदेशातील लखमपूर खिरी जिल्ह्यातील टिकोनिया येथे केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राने आंदोलकांना चिरडल्यानंतर हिंसाचार भडकला असून यामुळे उत्तरप्रदेशात तणाव पसरला आहे. यातच किसान मोर्चाने देशभर निदर्शन करणार असल्याचे जाहीर केल्याने हे प्रकरण चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात विकासकामांचे उदघाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकर्‍यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकर्‍यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्या. यात चार आंदोलकांचा मृत्यू झाला. यामुळे जमाव संतप्त झाल्याने हिंसाचार घडला. यात एकूण आठ जणांचा बळी गेला आहे. जमावात शिरलेल्या दोन कारपैकी एकात केंद्रीय मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष हा असल्याचा आरोप करण्यात आल्याने परिसरात तणाव वाढला आहे.

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. बीएसपी आणि कॉंग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

Protected Content