अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना २ कोटी ३३ लक्ष रूपयांची नुकसान भरपाई मिळणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेला पाठपुरावा निणार्यक ठरला आहे.

अमळनेर मतदारसंघातील १३० गावातील शेतकर्‍यांना फेब्रुवारी २१ मधील वादळी वारा व अतिवृष्टीमुळे झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीची भरपाई शासनातर्फे जाहीर करण्यात आली असून लवकरच वितरित होणार आहे. यात अमळनेर तालुक्यासाठी २ कोटी ३३ लक्ष तर पारोळा तालुक्यातील गावांसाठी ३२ लक्ष रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. ुआमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना ही मदत मिळणार आहे.

अमळनेर विधानसभा मतदार संघात दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अमळनेर तालुक्यातील ९५ व पारोळा तालुक्यातील ३५ गावांना फटका बसलेला होता. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, मका, गहू, बाजरी व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यात अमळनेर तालुक्यातील १७२५.७६ हेक्टर वरील २८९४ तर पारोळा तालुक्यातील २३४.६२ हेक्टर वरील ७३३ शेतकर्‍यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले होते.

या बाधित क्षेत्राचे पंचनामे देखील तातडीने करण्यात आले होते. यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता.नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल आमदार अनिल पाटील व प्रशासनाचे आभार मानले आहेत.दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकर्‍यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

सर्वाधिक मदत अमळनेर मतदारसंघाला

शासनाने व जळगाव जिल्हाधिकारी यांनी २५ ऑगस्ट २१ रोजी जाहीर केलेल्या नुकसानभरपाई मध्ये जिल्हाला एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपयांची मदत जाहीर केली असून यात अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी २ कोटी ६५ लक्ष रुपयांची भरीव मदत मिळाली आहे यासाठी मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात,कृषिमंत्री ना.दादा भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडवेट्टीवर, संबंधित खात्यांचे राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Protected Content