रावेरातुन होणार पाटील आणि महाजनांमध्ये जंगी मुकाबला !

रावेर शालीक महाजन | रावेर तालुक्यातुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील व विद्यमान संचालक नंदकिशोर महाजन पुन्हा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. दोघे निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असले तरी कॉंग्रेसने अद्याप आपले पत्ते खुले केले नसल्यामुळे चित्र स्पष्ट झालेले नाही. तथापि, यंदाही दोन्ही मान्यवरांमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल फुंकला असून घडामोडी गतीमान झाल्या आहेत. यात रावेर तालुक्याचा विचार केला असता येथे तुल्यबळ मुकाबला होण्याची शक्यता आहे. खरं तर आजवर आर्थिक सामाजिक आणि रणनीतीक बेसवर आता पर्यंत ही निवडणूक झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणार्‍या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष असते. सध्या रावेर तालुक्यातुन विकासो मतदारसंघातुन नंदकिशोर महाजन हे संचालक म्हणुन प्रतिनिधीत्व करत आहे.तर यंदा होणार्‍या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार अरुण पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. तर भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संचालक नंदकिशोर महाजन यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सध्या तरी दोन उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या आधीच कॉग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी अद्याप कॉग्रेसकडे उमेदवार नाही या संदर्भात आमदार शिरीष चौधरी म्हणाले की उमेदवारी संदर्भात उद्या एक महत्वाची बैठक घेतली जाईल अद्याप आमच्याकडे उमेदवार नाही बैठक घेऊन कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून उमेदवारी संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय पॅनलमध्ये कोणाला संधी ?

माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादी कडून इच्छुक आहे. तर भाजपा कडून नंदकिशोर महाजन इच्छुक आहे. जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी,भाजपा आणि शिवसेना असे तिघे पक्षाचे नेते एकत्र येऊन सर्वपक्षीय पॅनल तयार करणार आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातुन या पॅनलमध्ये कोणाला संधी मिळेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसच्या बैठकीकडे लक्ष

दरम्यान जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे तालुक्यातुन जिल्हा बँकेला कॉग्रेस कोणाला उमेदवारी देईल याकडे लक्ष आहे.येथून उमेदवार निवडणुन आणण्याची जबाबदारी कॉग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांच्या खांद्यावर असणार आहे.त्यामुळे उमेदवारी संदर्भात श्री चौधरी यांनी आज एक महत्वाची बैठक बोलवली आहे. यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातुन जिल्हा बँकसाठी ५४ ठराव

रावेर तालुक्यात एकूण ६२ विकासो आहे. त्यापैकी ८ ठिकाणी प्रशासक असून ५४ गावांचे ठराव रावेर तालुक्यातुन गेल्याची माहीती आहे. यामधुन सर्वात जास्त मते घेणारा उमेदवाराला जिल्हा बँकेत संचालक पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आर्थिक गणितांवर अवलंबून असते. यातून कोण बाजी मारणार याकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Protected Content