अभिनेत्री खुशबू सुंदर काँग्रेस सोडून भाजपमध्ये

चेन्नई: वृत्तसंस्था । तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेत्री आणि नेत्या खुशबू सुंदर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. दशकभराच्या राजकीय कारकिर्दितील खुशबू यांचा हा तिसरा पक्षप्रवेश आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती अशी खुशबू सुंदर यांची ओळख आहे. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. खुशबू सुंदर या टीव्ही प्रेझेंटर देखील आहेत. अभिनयामध्ये अनेक टप्पे पार केल्यानंतर सन २०१० मध्ये खुशबू सुंदर यांनी राजकारणात पाऊल ठेवले.

खुशबू सुंदर यांनी सर्वप्रथम डीएमके (द्रविड मुन्नेत्र कळघम) पक्षात प्रवेश केला. त्या वेळी डीएमके पक्षाचे नेतृत्व एम. करुणानिधी यांच्या हाती होते. यानंतर सन २०१४ मध्ये खुशबू सुंदर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस नेत्या म्हणून त्यांनी अनेकदा पक्षाची बाजू मांडली आहे. टीव्हीवरील चर्चांमध्ये मोठ्या मुद्द्यांवर देखील त्यांनी पक्षाचा बचाव करण्याचे काम केले आहे.

आता तामिळनाडूत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अशा परिस्थितीत खुशबू यांनी पक्ष बदलला आहे. मे २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. जयललिता यांच्या निधनानंतर एआयडीएमकेमध्ये फूट पडलेली आहे. दुसरीकडे डीएमके आणि काँग्रेस पक्ष आहे. खुशबू सुंदर भारतीय जनता पक्षाच्या या प्रयत्नांना शक्ती देण्याचे महत्त्वाचे काम करू शकतात.

तामिळनाडूच्या राजकारणात एमडीआर यांच्यापासून ते करुणानिधी आणि जयललिता यांच्यापर्यंत कलाकारांचा बोलबाला राहिलेला आहे. खुशबू सुंदर यांचीही स्वत:ची लोकप्रियता आहे. खुशबू सुंदर यांच्या चाहत्यांनी त्यांचे मंदिर देखील निर्माण केले आहे, .

खुशबू सुंदर यांनी बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यानंतर दक्षिणेतील चित्रपटक्षेत्रात त्यांचे नाणे चालले. तामिळ, मल्याळम, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांनी चांगले नाव कमावले. रजनीकांत, कमल हासन, नागार्जुन आणि व्यंकटेश अशा मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.

Protected Content