जळगाव, प्रतिनिधी | महानगरपालिकेने नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी शास्ती माफीची अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा कालावधी १५ नोव्हेंबर २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अभय योजनेस चारही प्रभागात नागरिकांनी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ नागरिकांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्यात भरणा करणाऱ्यांना शास्तीवर ९० टक्के सूट देण्यात आलेली आहे. हा पहिला टप्पा १५ नोव्हेंबर रोजी सुरु झालेला असून आज दि. १४ डिसेंबर रोजी समाप्त होणार होता, परंतु हा टप्पा आता २१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. १५ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकीत कराचा भरणा केल्यास शास्तीमध्ये ७५ टक्के सूट देण्यात येणार होती ही मुदत आता २२ डिसेंबर २०२१ ते ५ जानेवारी २०२२ करण्यात आली आहे. तसेच १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत कराचा भरणा करणाऱ्या नागिरकांना ५० टक्के शास्ती माफीचा लाभ घेता येणार होता ही मुदत आता ६ ते २० जानेवारी २०२२ करण्यात आली असल्याचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी कळविले आहे. ही योजना खुला भूखंड करासाठी लागू असून जास्तीत जास्त नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, १५ नोव्हेंबरपासून आज दि. १४ डिसेंबर सायंकाळपर्यंत प्रभाग समिती १ चा भरणा ५२ लाख १५ हजार ७६१ रुपये, प्रभाग समिती क्र. २ मध्ये ४० लाख ९७ हजार ४७७ रुपये, प्रभाग समिती क्र. ३ मध्ये ३६ लाख ६६ हजार ९७६ रुपये, प्रभाग समिती क्र. ४ मध्ये २७ लाख १५ हजार ७४२ रुपये असा चार ही प्रभागांचा एकूण भरणा १ कोटी ५६ लाख ९५ हजार ९५६ रुपये इतका झाला आहे.