“चांगली संगत नैतिक जीवन जगण्यास प्रेरित करते” : हभप सागर महाराज मराठे

जळगाव प्रतिनिधी | चांगल्या माणसांची संगत खूप महत्त्वाची असून ही संगत तुम्हाला नैतिक जीवन जगण्यास प्रेरित करते तर वाईट संगत तुम्हाला अधोगतीकडे नेते. म्हणून ‘सु संगत’ महत्वाची आहे . असे प्रतिपादन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांनी केले.

शहरात नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशनद्वारा आयोजित श्रीमद् भागवत संगीतमय भागवत कथा आणि अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान संपन्न होत आहे. कथेच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे बीड येथील हभप सोनालीताई करपे महाराज आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील हभप सागर महाराज मराठे यांचे कीर्तन झाले. कीर्तनामध्ये त्यांनी विविध संतांच्या अभंगांचे आणि विचारांचे दाखले देऊन भक्तीगीते सादर केली.

हभप सोनालीताई करपे म्हणाल्या की, “संतांच्या विविध अभंगांमधून देवाची भक्ती ही स्फुरत असल्यामुळे अभंग गायनातून एक विशिष्ट मानसिक शांतता लाभत असते. द्रौपदीची कृष्णाप्रति असलेली बंधूभक्ती आदर्श असून भगवान परमात्मासाठी पदराची चिंधी करून कृष्णाच्या जखमी करंगळीला बांधणे ही गोष्ट तिला प्रेमाची भेट देऊन गेली. आजच्या आधुनिक काळामध्ये संतांची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.” असे सांगत ‘आवडे देवांना तो एकची प्रकार’ ह्या भक्तिगीतातून त्यांनी अभंगाविषयीची महती सादर केली.

हभप सागर महाराज मराठे यांनी कीर्तनातून संतांनी अनिष्ट प्रथा परंपरां विषयी केलेले प्रबोधन विविध अभंगातून सांगितले, “देशात राजे खूप झालेत. मात्र ज्यांचे नाव अग्रक्रमाने, अभिमानाने घ्यावे असे छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांचे स्थान आजही अढळ आहे. देशभरात त्यांच्यामुळे स्वराज्य निर्माण झाले. पुण्य करत राहिले तर एक दिवस भगवंतच साक्षात तुम्हाला दर्शन देईल. प्रेम करा पण भगवंतावर आणि वैरदेखील भगवंतासोबतच करा. त्यामुळे तुम्ही त्याचे स्मरण करीत राहाल. आयुष्यात बदल होणे आणि काळानुसार बदलत जाणे हा संसार धर्म आहे. भक्ती करीत राहा, परमार्थ नक्की मिळेल ” असे विविध अभंगांच्या दाखल्यातून व कीर्तनातून हभप सागर महाराज यांनी सांगितले.

बुधवारी १५ डिसेंबर रोजी नाशिक येथील हभप पांडुरंग महाराज गिरी हे कीर्तन करणार आहेत. भाविकांनी नेहरूनगर येथील गुरुदत्त मंदिर येथे उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content