आदर्श लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याचे दु:ख; सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना

जळगाव प्रतिनिधी । भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व माजी आमदार हरीभाऊ जावळे यांचे निधनाने एक आदर्श लोकप्रतिनिधी, सच्चा कार्यकर्ता, मनमिळावूवृत्तीचा व शेतीचे प्रश्न मांडणारा राजकारणी काळाच्या पडद्याआड गेल्याचे दु:ख आहे अशा भावना जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत.

   “हरीभाऊ जावळे शेतकऱ्यांचा जाणकार असलेला नेता होता. त्यांची शरीरयष्टी उत्तम होती मात्र नम्रपणे वागणारा नेता होता, शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कळवळ होती. ते आमचे सुध्दा मार्गदर्शकच होते. ते अजात शत्रू व मनमिळावू देखील होते. पालकमंत्री व शिवसेना पक्षातर्फे मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो”.
                                                           – ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव

 

   “मातीशी नाळ असलेला एक सच्चा कार्यकर्ता हरीभाऊंच्या निधानाने हरपला आहे. विकास कामांची नांदी त्यांनी खासदारकीच्या काळात सुरू केली होती. मितभाषी व सत्यवादी व्यक्तीमत्व होते.
                                                             – आमदार शिरीष चौधरी (काँग्रेस), यावल

 

   “खरं तर त्यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. माझे व त्यांचे नाते पारिवारीक होते. पक्षाचे ते ज्येष्ठ व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने एक निष्पृही व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने पक्षनिष्ठ माणूस गमावला आहे”.
                                                             – खासदार रक्षा खडसे, रावेर (भाजपा)

 

   “हरीभाऊंचे निधन झाले यावर विश्वासच बसला नाही. एक चांगला कार्यकर्ता गमावला आहे. सगळ्या पक्षातल्या लोकांमध्ये मैत्री ठेवणारा हे राजकीय व्यक्ती होता. कौटुंबिक कार्यक्रमात मला ते नेहमी सहभागी करून घेत असत. श्री. जावळे यांनी त्यांच्या माध्यमातून शेकडो रूग्णांना आमच्या हॉस्पिटलला पाठविले आहे. एक संयमशील, सत्वशील व कोणाबद्दलही वाईट न बोलणारा नम्र व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला आहे”.
                                                        -माजी खासदार उल्हास पाटील

 

   “एक मनमिळावू व समाजातील सर्व स्तरांमध्ये फिरणारे व्यक्तीमत्व म्हणजे हरीभाऊ जावळे. खासदार असतांना संसदेत तर आमदार असतांना विधानसभेत त्यांनी विशेष करून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्ना निर्भीडपणे मांडले, त्याला यशही आले. भारतीय जनता पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता हरपला आहे. एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे”.
                                                     -आमदार राजूमामा भोळे, जळगाव (भाजपा)

 

   “हरीभाऊ जावळे हे सर्वांमध्ये रूळलेले राजकारणी होतो. विशेषकरून त्यांनी शेती व केळीच्या संदर्भात संसदेत आवाज उठविला. त्यांना न्याय मिळवून दिला. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. एक दमदार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आजचा दिवस हा दु:खदायक असा आहे. त्यांना राष्ट्रवादी पक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे भावपुर्ण श्रध्दांजली”.
                                                -ॲड.रविंद्रभैय्या पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

   “हरीभाऊंच्या निधनाने लेवा समाजाचे खंदे कार्यकर्ते, मार्गदर्शक व प्रेरणादायी विचार देणारे व्यक्तीमत्व हरपले असून समाजाची मोठी हानी झाली आहे. ती कधीही भरून न येणारी आहे. समाजाचे मेळावे स्नेहसंमेलन तसेच विविध उपक्रमात समाजबांधवांना उर्जा देण्यासाठी आवर्जून उपस्थिती देत होते. समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी ते प्रसन्नदायी व स्पृहनीय व्यक्तीमत्व होते. लेवा समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हिरारीने सहभाग घेतला”.
                                               – रमेश विठू पाटील, कुटुंब प्रमुख, भोरगाव लेवा पंचायत

 

   “अजातशत्रू, अतिशय मनमिळाऊ, निगर्वी व जमिनीवर असलेल्या नेत्याला आज आपण मुकलो आहोत याचं खूप दुःख होत आहे. हरिभाऊ म्हणजे त्यांच्या नावसारखेच होते. माजी खासदार, माजी आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली”.
                                                          – योगेश देसले, प्रवक्ता, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

Protected Content