भुसावळ प्रतिनिधी । पाठ्यपुस्तकातील पाठ शिकण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भाषा वापराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्यास अध्ययन सुलभ होण्यास मदत होते. शिक्षकांनी सर्जनशीलता, कल्पकता व शोधक वृत्तीने भाषिक कृतींची रचना केल्यास आणि विद्यार्थ्यांना करायला लावल्यास पाठ शिकण्याची मजा येईल आणि त्यातूनच भाषिक क्षमतांचा विकास होऊन खऱ्या अर्थाने भाषा शिकण्याचा आनंद मिळेल, असे प्रतिपादन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
पुणे येथील माय मराठी महाराष्ट्र समूहातर्फे आयोजित वेबिनार पाठात सुमारे दीड हजार शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रारंभी संघाचे मार्गदर्शक हनुमंत कुबडे अण्णा यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा देशपांडे यांनी डॉ. पाटील यांचा परिचय करून दिला. पुणे जिल्हाध्यक्ष यशवंत बेंद्रे, सचिव अशोक तकटे, संजय गवांदे, सारंग पाटील, ज्ञानदेव दहिफळे, डॉ. प्रिया निघोजकर, मुरलीधर भुतडा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. जगदीश पाटील यांनी इयत्ता दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी या पाठाचे क्षमतांवर आधारित अध्ययन पाठ या अनुषंगाने पीपीटीद्वारे सविस्तर सादरीकरण केले.
सुरूवातीला त्यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमासंदर्भात सांगून अभ्यासक्रम व मूल्यमापन या दोघांमध्ये अध्ययन-अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकातून क्षमता विकसित कशा होतील यासाठी भाषा शिक्षकांनी भर देणे गरजेचे आहे. अध्यापनाकडून अध्ययनाकडे वाटचाल करताना पारंपारिकतेसोबत आधुनिकता देखील जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. इझीटेस्ट व झूमच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेबिनारमधील या पाठाच्या सादरीकरणाला संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे दीड हजार शिक्षक ऑनलाईन सहभागी झाले होते. माय मराठी महाराष्ट्र संवादतर्फे आयोजित वेबिनार पाठात पहिलाच पाठ सादर करण्याची संधी जळगाव जिल्ह्याला म्हणजेच डॉ. जगदीश पाटील यांना मिळाली. पाठ सादरीकरणानंतर अनेकांनी प्रत्यक्ष बोलून व चॅटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्यांना या ऑनलाईन सादरीकरणाचा लाभ घेता आला नाही त्यांना इझीटेस्ट ॲपवर हे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुरलीधर भुतडा यांनी सांगितले. सूत्रसंचालन सारंग पाटील यांनी तर आभार डॉ. प्रिया निघोजकर यांनी मानले.