अजूनही धोका टळलेला नाही- सावद्याच्या मुख्याधिकार्‍यांचा इशारा

सावदा ता रावेर जितेंद्र कुलकर्णी । लॉकडाऊन शिथील होत असले तरी अजून धोका टळलेला नाही. यामुळे सावदा येथील नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.

प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या सोबत सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी हे कोरोनाच्या प्र्रतिकारासाठी पहिल्या दिवसापासून मैदानात उतरून काम करत आहेत. आता कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असतांना त्यांनी शहरवासियांनी एका निवेदनाच्या माध्यमातून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगभर करोना साथीने थैमान घातले आहे. ही साथ साधारण डिसेंबर २०१९ मध्ये सुरू झाली. भारतात मार्च महिन्यात प्रादुर्भाव सुरू झाला. तर सावद्यामध्ये मे महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. मार्च महिन्यापासून आपण विशेष काळजी घेण्यास जसे, मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करणे, हात वारंवार धुणे आदींना सुरुवात केली. मधल्या काळात संपूर्ण भारतभर लॉकडाऊन करण्यात आला असून याला हळूहळू शिथिल केले जात आहे. असे असल्याने करोना साथ आता संपली असा त्याचा अर्थ आपण काढता कामा नये. किंवा आता काळजी घेण्याची गरज नाही असे देखील आपल्याला वाटता कामा नये. कारण भूतकाळात येऊन गेलेल्या विविध साथींचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की या साथींच्या काळात पहिल्यांदा साथीची लाट येऊन गेल्यावर जेव्हा लोक काळजी घेण्याचे कमी करतात तेव्हा येणारी साथीची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा मोठी व भयानक असते. त्यामुळे आपला धोका अजुन टळलेला नाही.

सौरभ जोशी यांनी पुढे म्हटले आहे की, सावदा नगरपालिके तर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मास्क वापरणे,फिजीकल डिस्टन्स पाळणे, वारंवार हात धुणे तसेच हात धुणे शक्य नसल्यास ीरपळींळूशी चा वापर करणे, काम नसल्यास घराबाहेर न पडणे या सारख्या गोष्टी आपण पाळाव्यात.
सर्व व्यापारी बंधूंना माझी विनंती राहील की आपल्या दुकानात येणार्‍या ग्राहकांमध्ये फिजीकल डिस्टन्सींगचे पालन होते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आपली राहील. येणार्‍या ग्राहकांना आपण सॅनिटायझर उपलब्ध करून द्यायचे आहे. तसेच आपण स्वतः मास्क वापरणे गरजेचे आहे, ग्राहकाने मास्क लावलेला नसल्यास त्यास आपण दुकानात प्रवेश देऊ नये. दुकानदाराने मास्क लावलेला नसल्यास ग्राहकांनी त्या दुकानात जाऊ नये.
कोणताही व्यापारी या गोष्टींचे पालन न करता व्यापार करताना आढळल्यास त्यांना दंडात्मक व फौजदारी कारवाईस सामोरे जावे लागेल. तसेच नागरिकांनी देखील या गोष्टीचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच शासनाने वेळोवेळी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे. काळजी घ्या, सुरक्षित रहा असे आवाहन सौरभ जोशी यांनी केले आहे.

Protected Content