अखेर धरणगावात कोरोनाची एंट्री : वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह

धरणगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या प्रकोपापासून दूर राहिलेला धरणगावात अखेर या विषाणूचा संसर्ग झाला असून एक वृध्द महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्या आल्याच्या वृत्ताला मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान रात्रीच या महिलेच्या निवासाचा परिसर सील करण्यात आला आहे.

धरणगावच्या सीमेला लागून असणार्‍या अमळनेरात कोरोनाचा हाहाकार असून जळगाव व चोपड्यातही याचा प्रकोप आढळून आला आहे. तथापि, आजवर धरणगावात या विषाणूचा संसर्ग आढळून आला नव्हता. काही दिवसांपूर्वी खत्री गल्लीतील रूग्णाचा स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तर यानंतर पारधी वाड्यातील मृत झालेल्या तरूणाचा स्वॅब रिपोर्ट पाठविण्यात आला असून याचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. या पार्श्‍वभूमिवर शहरातील लहान माळीवाडा,नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेचे स्वॅब सँपल 13 तारखेला घेण्यात आल्याची माहिती कळतेय. ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती आज प्रशासनाला रात्री कळली. यानंतर लागलीच संबंधित परिसर सील करण्यात येत असून अत्यावश्यक सेवा वगळता येथे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे.

धरणगावातील वृध्द महिलेवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून तिच्या संपर्कातील लोकांना आवश्यकतेनुसार क्वॉरंटाईन करण्यात येणार असून गरज भासल्यास काहींची स्वॅब चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान परिस्थितीवर शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन हे लक्ष ठेवून आहेत.

Protected Content