अंनिस जळगाव शाखेतर्फे डॉ. टोणगावकर यांना आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र अंनिसचे माजी राज्य उपाध्यक्ष दोंडाईचा येथील डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जळगाव शाखेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी.एस.कट्यारे म्हणाले की, डॉ.रविंद्र टोणगावकर, दोंडाईचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे खंदे कार्यकर्ते, मार्गदर्शक व माजी राज्य उपाध्यक्ष, उत्तम लेखक, शल्यचिकित्सक होते.

फसव्या वैद्यकीय उपचार पद्धतीवर त्यांनी सतत आवाज उठवला.त्यासाठी त्यांनी लेखन, परिषदा घेतल्या. सोज्वळ,शांत स्वभाव, जगण्यातील साधेपणा तसेच दातृत्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरले होते. एखाद्या जिल्हा रुग्णालयाएवढी गर्दी त्यांच्या दवाखान्यात असायची. रात्रीचे दोन वाजेपर्यंत त्यांचा ओपीडी असायची. ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्जन संघटनेचे ते जागतिक पातळीवर अध्यक्ष होते. त्या निमित्ताने त्यांचे देश-विदेशात भ्रमंती होत असे.

हर्निया आजारावरील आॅपरेशनसाठी लागणारी जाळीची किंमत दीड हजार ते दहा हजार इतकी होती..त्यावर संशोधन करून स्वत:ची
टोणगावकर मेष या नावाची हार्नीया जाळी शोधली. या जाळीची किंमत फक्त पन्नास पैसे ते दोन रुपये इतकी कमी झाल्याने रुग्णांकडून जाळीची किंमत घेतली जात नाही. त्यांच्या या संशोधनाची जागतिक आरोग्य परिषदेने प्रथम क्रमांक देऊन सन्मान केला .जगभरातील अठ्ठावीस देशात या स्वस्त जाळीचा वापर होत आहे.

या विश्वात न आत्मा आहे ना देव आहे,या विचारावर टोणगावकर ठाम राहिले. माझी अध्यात्मिक वाटचाल, दोंडाईच्याचा डाॅक्टर ही पुस्तके महाराष्ट्भर खूप मोठ्या प्रमाणात वाचले जातात.
जनजागृतीचे मोठं काम उभं करणाऱ्या या शल्यचिकित्सकाची आनंदी समाधानी वाटचाल कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रा. कट्यारे यांनी सांगितले. यावेळी ऍड.भरत गुजर, विश्वजीत चौधरी, जितेंद्र धनगर, शिरीष चौधरी, आर.एस.चौधरी, गुरुप्रसाद पाटील, सुरेश थोरात, कल्पना चौधरी, मिनाक्षी कांबळे आदी उपस्थित होते.

Protected Content