उत्तर महाराष्ट्रातही अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच

जळगाव प्रतिनिधी/ – कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग विषयांसह प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले जाणार असून अपवादात्मक परिस्थितीतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल. १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील व १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होऊन ३१ ऑक्टोबर पर्यंत निकाल जाहीर केले जातील. लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी असणार आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार . सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राज्यशासनाच्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी विद्यापीठाने स्थानिक पातळीवर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. त्या समितीचा अहवाल विद्यापरिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि व्यवस्थापन परिषद बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने व वस्तूनिष्ठ स्वरूपात बहूपर्यायी घेण्याचा निर्णय झाला.
पदवी परीक्षांसाठी ६० गुणांची परीक्षा राहणार असून परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. तर पदव्युत्तर परीक्षा ६० गुणांची व १२० मिनिटांचा कालावधी असेल. प्रात्यक्षिक परीक्षा १५ सप्टेंबर पासून सुरु होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळा‍वर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

पदविका, पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन विद्यापीठ अनुदान आयोगाच्या , राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलावता त्याचे मूल्यमापन. १३ मार्चपर्यंत संबंधित विषयांचे नियमित झालेले प्रात्यक्षिके, जर्नल्स, टर्मवर्क, अंतर्गत मौखिक परीक्षा, विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती अथवा अभ्यासक्रमात नमूद तत्सम तरतुदी यांच्या आधारे व Online माध्यमातून /दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रात्यक्षिकावर आधारीत मौखिक परीक्षा आयोजित करून मूल्यमापन केले जाईल.

ज्या अभ्यासक्रमांतर्गत मौखिक परीक्षा किंवा प्रकल्प अहवालावर आधारीत मौखिक परीक्षा आहे, त्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न बोलविता दूरध्वनीद्वारे मुलाखत, स्काईप किंवा इतर ऑनलाईन माध्यमाद्वारे सादरीकरणाद्वारे करता येईल. ज्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प अहवाल जमा झालेले नसतील त्यांचे सॉफ्टकॉपीच्या आधारे अभ्यासक्रमामधील नमूद आराखड्याप्रमाणे मूल्यमापन करण्यात येईल. अंतिम वर्षातील पूनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे व पद्व्युत्तर वर्गाच्या प्रकल्पाचे मूल्यमापन देखील असेच करण्यात येईल. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर जाहीर करावे. या संदर्भात विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये / प्रशाळा यांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

लेखी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी राहणार आहे अभियांत्रिकी व तांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या अंतर्गत अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता Online पध्दतीने घेण्यात येईल. कला, विज्ञान, वाणिज्य आणि समाजकार्य या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता Online पध्दतीने Laptop / Desktop with web camera / Smart Phone याद्वारे परीक्षा घेण्यात येईल. ही साधने उपलब्ध होत नसल्यास परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन OMR वर आधारीत MCQ परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल.

विद्यार्थ्यांना सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. बी.एफ.ए. , एम.एफ.ए. , आर्किटेक्चर अशा कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा कालावधी जास्त असल्याने Online परीक्षा घेणे शक्य नाही.अशा अंतिम वर्ष नियमित व Backlog सह (ATKT) विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन पारंपरिक पध्दतीने केले जाईल. महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात येवून परीक्षा केंद्रावर न बोलविता परीक्षा घेण्यात येईल.

जे विद्यार्थी अपवादात्मक परिस्थितीत Offline पर्याय निवडतील त्यांच्या Offline पध्दतीच्या परीक्षांचे आयोजन शारीरिक अंतर राखून, विद्यार्थ्यांची सुरक्षा व परीक्षांचे पावित्र्य राखून महाविद्यालयांकडून करण्यात येईल. Offline पध्दतीने आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षां जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांना अवगत करून त्यांच्या सहकार्याने घेण्यात येतील. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे सवलती दिल्या जातील.

अंतिम वर्ष नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा . १३ मार्चपर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारीत होतील. अभ्यासक्रम विद्यापीठाच्या www:nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या Backlog (ATKT) विषयांच्या परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत असतील. वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नपत्रिका तयार करून आयोजित करण्यात येतील. कोणत्याही कारणास्तव जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली जाईल व त्यासाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन करण्यात येईल.

दूरस्थ शिक्षण व अध्ययन विभाग अंतर्गत प्रवेशित बहिस्थ अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करून आयोजित करण्यात येतील व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर न बोलविता घरी राहून Online पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा Laptop / Desktop with web camera / Smart Phone याद्वारे घेण्यात येईल.
प्रात्यक्षिक परीक्षा . १५ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरया कालावधीत घेण्यात येतील. निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल
काही अपवादात्मक‍ परिस्थितीत सर्व परीक्षा व त्यांचे निकाल दिलेल्या तारखेपर्यंत जाहीर करणे शक्य झाले नाही तर कुलपती व शासनाकडे मुदतवाढीसाठी विनंती करण्यात येईल. लेखी परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www:nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल. परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निराकारण करण्यासाठी Helpline सुरु करण्यात येईल.

Protected Content