सर्व १३ विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच

मुंबई वृत्तसंस्था – राज्यातील सर्व १३ अकृषक विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच होणार असून, त्या बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे घेतल्या जातील यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व विद्यापीठांनी आपण परीक्षा कशी घेणार याचा अहवाल राज्य उच्च शिक्षण संचालकांकडे सादर केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनीअरिंग आणि तांत्रिक परीक्षा वगळता इतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या लेखी स्वरूपात घेणार असल्याचे ठरविले आहे.

कोरोना काळात अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन करताना, विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, याबाबत राज्य सरकार तसेच राज्यपाल आग्रही होते. सर्व विद्यापीठांनी नेमकी काय तयारी केली आहे याचा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी विद्यापीठांना केल्या होत्या.

अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासांची होईल. १०० गुणांऐवजी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा कॉले जस्तरावर ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचेही विद्यापीठांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कॉलेजमध्येच परीक्षा होतील. सर्व विद्यापीठांनी परीक्षा पूर्ण करण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे. सहा महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर आहेत. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची सवय नाही. यामुळे विद्यापीठांनी प्रश्नसंच उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणार असल्याचे युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

ऑफलाइन परीक्षांचे पर्यायही देण्यात येणार आहेत. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने इंजिनीअरिंग व तांत्रिक शाखा वगळता इतर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी ज्या कॉलेजमध्ये शिकले, त्या कॉलेजमध्येच घेण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून, त्यापैकी कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दीड तासात सोडवायचे आहे. असा निर्णय घेणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

Protected Content