जळगाव प्रतिनिधी । येथील जी.एच. रायसोनी महाविद्यालयात आज विभागीय युवारंग महोत्सव रंगला. यात तरूणाईने आपल्यातील विविध कौशल्यांचा अविष्कार सादर केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवारंग युवक महोत्सवाची सुरूवात महाविद्यालयाच्या प्रांगणात जल्लोषात झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार राजूमामा भोळे. महानगर पालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे, पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, संगीता निंबाळकर, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, उपाध्यक्ष अविनाश रायसोनी, परिसंस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.प्रिती अगरवाल, प्राचार्य डॉ. ए.जी.मॅथ्यु, विद्यार्थी विकास संचालक प्रा.सत्यजित साळवे, प्रा.पवन पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा.रफिक शेख, युवारंग युवक महोत्सवाचे समन्वयक प्रा.राजकुमार कांकरीया आदी उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाच्या रेणूका पंडीत या विद्यार्थीनीने बहिणाबाईंची कविता सादर केली. याप्रसंगी बोलताना आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चांगले मित्र मिळवा, आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी या आपण मित्राजवळच सांगतो तेव्हा निस्वार्थी व चांगले मित्र नेहमी जवळ ठेवा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी जोश, उत्साहासोबतच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित न राहता येणाज्या निवडणूकीत मतदान करण्याचे युवावर्गाला आवाहन केले. पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी युवारंग हा आनंदोत्सव आहे. अभ्यासापासून थोडे दूर राहून आनंद देणारा हा महोत्सव आहे. यातून व्यक्तिमत्वाचा विकास होतो. भरपूर आनंद लुटा यामुळे उर्जा प्राप्त होते. ही उर्जा योग्य कामासाठी वापरल्यास आनंदी जीवन जगण्यास मदत मिळते. निसर्ग आणि संगीत यापासून सात्वीक आनंद मिळतो हा आनंद ज्यांनी घेतला तो कधीही दु:खी होत नाही, ज्यावेळी शक्य आहे तेव्हा आनंद लुटा, यशस्वी व्हायचे असेल तर आनंद महत्वाचा आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर म्हणाले की, आजची युवा पिढी ही भारताची ताकद आहे आणि हीच भारताला शक्तीशाली बनवेल ज्यामुळे भारत हा आदर्श देश असेल.
प्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. जळगाव विभागातील या युवक महोत्सवात ३९ महाविद्यालये ५७० विद्यार्थ्यांनी या युवक महोत्सवात सहभाग नोंदविला. सुत्रसंचालन रंगकर्मी हर्षल पाटील यांनी तर आभार समन्वयक प्रा. राजकुमार कांकरीया यांनी मानले. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रशांत चौधरी यांने सहभागी स्पर्धकांना महोत्सवाची शपथ दिली. विविध रंगमंचास प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.प्रिती अग्रवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी, अविनाश रायसोनी, प्रितम रायसोनी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी भेटी दिल्या.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सात रंगमंच तयार करण्यात आले होते. सकाळी ८.३० वाजेपासून प्रत्येक रंगमंचावर विद्याथ्र्यांनी आपल्या कला सादर करण्यास सुरूवात केली. दुपारच्या सत्रात युवारंग महोत्सवाचे कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, दीपक बंडू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भेट दिली.
रंगमंच निहाय सादर केलेल्या कलाप्रकाराचा तपशिल
रंगमंच क्रमांक १:- मिमिक्री या कलाप्रकारात प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सिनेकलावंत नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, निळू फुले, गुलशन ग्रोवर, धमेंद्र, सनी देवोल आदींच्या आवाजात सादरीकरण केले. या कलाप्रकारात एकुण ११ महाविद्यालयांनी सादरीकरण केले. याच मंचावर विडंबन नाटघ कलाप्रकारात भ्रष्टाचार, ते दोन थेंब, सॅनीटरी नॅमकिनविषयी समज-गौरसमज, शेतकरी आत्महत्या, स्वयंवर आजच्या युगातले, बीगबॉस, दुष्काळ, आला दिवस गेला दिवस, रूदाली, मधु वेड संजू, काळी पिशवी आदी विषय हाताळले. मुकनाटघ कलाप्रकारात १४ तर समुह लोकनृत्य कला प्रकारात १४ महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला.
रंगमंच क्रमांक २:- सुगम गायन (भारतीय) या कलाप्रकारात १७ महाविद्यालयांनी सहभाग नोंंदविला याच मंचावर शास्त्रीय गायन , समुह गीत (पाश्चिमात्य) समूह गीत (भारतीय) आदी कलाप्रकार सादर झाले.
रंगमंच क्रमांक ३:- काव्यवाचन – या कलाप्रकारात शेतकज्यांची आत्महत्या, भारत माता, वो लडकी मुझे पसंद है आदी विषयावर १८ महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी काव्यवाचन केले. याच मंचावर वादविवाद कलाप्रकारात आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत काय ? या विषयावर १८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. तर वक्तृत्व या कलाप्रकारात माणसातील माणसे ओळखा या विषयावर २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला.
रंगमंच क्रमांक ४ :- फोटोग्राफी या कलाप्रकारात १३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला, शास्त्रीय वादन सुरवाद्य या कलाप्रकारात ०४ व शास्त्रीय वादन तालवाद्य या कलाप्रकारात ०४ महाविद्यालयांनी हमीर, यमन, मारूपीहाग, मालकंस हे राग प्रकार हाताळले.
रंगमंच क्रमांक ५:- सुगम गायन या कला प्रकारात १० महाविद्यालयांनी, भारतीय लोकगीत या मुरली वाजतो कान्हा, बुरगुंडा होईल तुला, राधे तुला पुरतो घोंगडीवाला, खंडेरायाच्या लग्नाला, सुया घे धामन घे, महूवा झरे रे महूवा झरे आदी गीते सादर केली एकुण १५ महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदविला होता. लोकसंगीत कलाप्रकारात ०६ महाविद्यालये तर शास्त्रीय नृत्य कलाप्रकारात ०६ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ६ :- चित्रकला या कलाप्रकारात १५ विद्याथ्र्यांनी, व्यंगचित्र कलाप्रकारात ०८ विद्याथ्र्यांनी, स्पॉट पेंटींग कलाप्रकारात ०८ तर रांगोळी कलाप्रकारात २१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
रंगमंच क्रमांक ०७ :- मेहंदी या कलाप्रकारात २७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, इन्स्टॉलेशन या कलाप्रकारात १४ विद्याथ्र्यांनी तर कोलाज कलाप्रकारात १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.