नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर येथे वनरक्षकाच्या भरतीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पेटूर येथील रहिवासी सचिन दिलीप लांबट (वय २८) याचा धावण्याची चाचणी देत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. या युवकाचा मृत्यू कसा झाला याचे कारण शवविच्छेदननंतरच कळणार आहे. नागपूर येथे ४ मार्च रोजी ४० हजार पेक्षा अधिक वनरक्षकांची धावण्याची चाचणी घेण्यात आली.
सकाळी वनरक्षकांच्या भरतीत सहभागी उमेदवारांची धावण्याची चाचणी सुरू झाली. अंतिम रेषेजवळ सचिन लांबटला भोवळ आली आणि तो जमिनीवर कोसळला, पण त्यानंतर तो उठला आणि धावू लागला. त्याला नंतर इतर उमेदवारांनी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. संध्याकाळी त्यांची प्रकृती सुधारलेली होती. वन विभागाने आई-वडीलांनाही नागपूरात बोलावले होते, परंतू अचानक रात्री ११ वाजता त्यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. वनविभागाचे अधिकारी त्याचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करत होते. वनरक्षकाच्या लेखी परिक्षेत तो उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याचे वडील शेती करतात.