Home Cities जळगाव तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी – कृष्णराज महाडिक

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी – कृष्णराज महाडिक

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम बनले असले तरी त्याचा मानवी मनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्याचा योग्य आणि सकारात्मक वापर करणे गरजेचे आहे. तरुणांमध्ये संयम कमी होत असून अपयश किंवा पराभव स्वीकारण्याची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे, असे मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात भाजयुमोच्या ‘जागर यात्रा’निमित्त रविवार, २८ जून रोजी आयोजित भव्य संवाद कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी हजारो विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील होते. व्यासपीठावर भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीपदादा सावळे, भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस डॉ. केतकीताई पाटील, दौरा संपर्क प्रमुख तेजस्विनी दुर्गे, भाजपा जिल्हा महामंत्री, भुसावळ उपाध्यक्ष क्रिश कोठारी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राम शिंदे, निलेश पाटील आणि वीरेंद्रदादा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीने सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर ‘एकच मोर्चा, युवा मोर्चा’ अशा घोषणांनी दणाणून गेला होता. कृष्णराज महाडिक म्हणाले की, सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याचा उपयोग ज्ञान, कौशल्य आणि समाजहितासाठी करता आला पाहिजे. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तरुणांमध्ये चिडचिड आणि अस्वस्थता वाढताना दिसत आहे. त्यामुळे जीवनातील अपयश स्वीकारण्याची आणि त्यातून शिकण्याची मानसिकता प्रत्येक तरुणाने विकसित करणे आवश्यक आहे.

आपल्या अनुभवाबद्दल बोलताना महाडिक यांनी सांगितले की, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणे आव्हानात्मक असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. मी स्वतः ‘मकोबा’ या माध्यमाचा वापर करतो. यूट्यूबच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न स्वतःसाठी न वापरता समाजातील विविध कल्याणकारी कामांसाठी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कौटुंबिक मूल्ये जपण्यासाठी कुटुंब व्यवस्थेवरही विशेष काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री डॉ. केतकीताई पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देशातील प्रत्येक तरुणाने बौद्धिक, कौशल्याधारित आणि नैतिक विकास साधला, तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल. युवा पिढीने स्वतःला सक्षम बनवून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आज माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती साधावी, असा सल्ला त्यांनी दिला.

आई-वडिलांनी विश्वासाने आणि मोठ्या अपेक्षेने शिक्षणासाठी पाठविले आहे, त्याचा आदर राखा. आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी करा, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमासाठी गोदावरी फाऊंडेशन संचलित वैद्यकीय, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, नर्सिंग आणि आयुर्वेद महाविद्यालयातील व्यवस्थापन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound