


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथे वीज कोसळून 21 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
कठोरा बुद्रुक शिवारातील शेतामध्ये किशोर तायडे आणि त्यांचा 21 वर्षीय मुलगा अखिलेश हे दोघेही शेतकाम करत असताना अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याच वेळी अखिलेश तायडे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने तो जागीच कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अखिलेश याला वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
अखिलेश तायडे याची काही दिवसांपूर्वीच अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती आणि तो लवकरच नोकरीला लागणार होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या अशा अचानक आणि अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



