पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने आकाश राजेश यादव (वय २५) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आकाश यादव हा गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात आपल्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो थेट नदीतील खोल डोहात पडला. आकाशला पोहता न येत असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सायंकाळ झाली तरी आकाश घरी परतला नसल्याने त्याच्या भावाने शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याचा मृतदेह नदीतील डोहात आढळून आला. लगेचच त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. आकाश यादव हा अत्यंत मेहनती, शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे वृद्ध आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.