सावदा भूमिअभिलेख कार्यालयाचा मनमानी कारभार; माजी उपनगराध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयाच्या या मनमानी कारभाराविरोधात सावद्याचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबातील दुर्गेश तुषार महाजन (सज्ञान) आणि आयुष तुषार महाजन यांच्या नावाची भूमिअभिलेख नोंदणी करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज केला होता. त्यावेळी दोघांची नावे सज्ञान म्हणून नोंदवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात आयुष तुषार महाजन हे त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्यांचे नाव ‘अज्ञान’ असे दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, अर्ज करून सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अद्याप ही साधी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

या दिरंगाईमुळे त्रस्त झालेले दत्तात्रय महाजन म्हणाले, “आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून सावदा भूमिअभिलेख कार्यालयात अनेक वेळा चकरा मारल्या, परंतु कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. उलट, अत्यंत नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.” त्यांनी आठवण करून दिली की, यापूर्वी रावेर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीतही अनेक नागरिकांनी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर पैसे घेऊनही काम न करण्याचे गंभीर आरोप केले होते.

महाजन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रशासनावर चांगली पकड असलेले आणि जनतेच्या समस्यांची जाण असलेले नेते आहेत. मात्र, सावदा भूमिअभिलेख कार्यालयातील अशा निष्काळजी अधिकाऱ्यांमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यांनी मागणी केली की, नागरिकांवर अन्याय करणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

या गंभीर तक्रारीची प्रत माहितीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि भूमिअभिलेख अधीक्षक अभियंता, जळगाव यांना देखील पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.