यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) २०२५ च्या निकालात यावल तालुक्यातील उंटावद येथील कु. वैष्णवी महेश पाटील हिने उत्कृष्ट यश संपादन केले आहे. तिने डांभुर्णी येथील डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालय व केंद्रातून ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
वैष्णवीचे वडील ह.भ.प. महेश भगवान पाटील हे प्रसिद्ध कीर्तनकार आणि कथावाचक आहेत, तर तिचे आजोबा भगवान अभिमन पाटील हे १९७५ साली सी.ए. झाले आहेत. तिच्या कुटुंबात शिक्षण आणि अध्यात्माचा वारसा आहे.
कु. वैष्णवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे चेअरमन तथा जळगाव येथील गजानन हार्ट क्रिटिकल सेंटरचे संचालक डॉ. विवेक दिवाकर चौधरी आणि मुख्याध्यापक उमाकांत महाजन यांच्यासह शिक्षक दिनेश ठाकूर, जितेंद्र फिरके, विवेक महाजन, पंकज भालेराव, भूषण भिरूड आणि भुसावळ येथील बियाणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य व वैष्णवीचे फुवा डी.एम. पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उंटावद येथील ओंकारेश्वर मंदिरात वैष्णवीच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तिचे वडील भगवान पाटील, बापूराव पाटील आणि कुटुंबातील सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैष्णवीच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.