जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात फेब्रुवारी महिन्यात एका लग्न समारंभात ८५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मीनगर, गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी परिसरातील एका लग्न समारंभात पुष्पाबाई जगन्नाथ न्याती (वय ८५) या रात्री ९ वाजेच्या सुमारास एका खोलीत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्याला काहीतरी टोचल्याचे सांगून २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकाने सुरू केला होता. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित अनिल हरताडे याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीची माहिती मिळाल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाने त्याला पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, पोलीस हवालदार अक्रम शेख आणि बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.