पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मंगरूळ येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीतून चोरीस गेलेल्या जलपरी मोटार प्रकरणाचा पारोळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली जलपरी मोटार आणि इतर साहित्य असा एकूण ₹1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक 296/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या जलपरी मोटारीची चोरी झाल्याने या गुन्ह्याला गांभीर्याने घेत पोलीस यंत्रणा तातडीने तपासाला लागली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेवरून आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक डॉ. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिथुन पाटील आणि आकाश पाटील यांचा समावेश असलेल्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक स्तरावरील तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली जलपरी मोटार तसेच इतर साहित्य असा सुमारे ₹1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला असून, आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पारोळा पोलिसांनी अल्पावधीत केलेल्या या प्रभावी कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या शेतीसाठी महत्त्वाच्या उपकरणांची चोरी उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत केले आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.



