Home उद्योग ‘प्रवासी आहे म्हणूनच लालपरी आहे’ ; प्रवाशांच्या गैरसोयीला प्रथम प्राधान्य द्या, आगार...

‘प्रवासी आहे म्हणूनच लालपरी आहे’ ; प्रवाशांच्या गैरसोयीला प्रथम प्राधान्य द्या, आगार व्यवस्थापक ईम्रान पठाण यांचे चालक-वाहकांना आवाहन

0
30

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल एसटी आगाराची सूत्रे नुकतीच हाती घेतलेल्या आगार व्यवस्थापक ईम्रान पठाण यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “प्रवासी आहे म्हणूनच एसटीची लालपरी आहे. त्यामुळे प्रत्येक चालक, वाहक आणि कर्मचाऱ्याने प्रवाशांच्या सेवेसाठी शिस्तीने व तत्परतेने काम करावे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.

यावल आगारात मागील चार वर्षांपासून कार्यरत असलेले तत्कालीन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांची नुकतीच एरंडोल येथे बदली झाली. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रावेर येथे कार्यरत असलेले ईम्रान पठाण यांची यावल येथे बदली करण्यात आली असून त्यांनी आगार व्यवस्थापकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना पठाण यांनी प्रवाशांच्या प्रश्नांना आपले अग्रक्रम असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांशी चालक-वाहकांनी आपुलकीने वागावे तसेच प्रवासादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावल आगारातील मोठ्या प्रमाणातील नादुरुस्त बसेसचा प्रश्नही आपल्या अजेंड्यावर असल्याचे पठाण यांनी सांगितले. नादुरुस्त वाहनांमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार असून, उपलब्ध बससेवा अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावल आगारातून लांब पल्ल्याच्या अनेक बसफेऱ्यांच्या मागण्या गेल्या काही काळापासून प्रलंबित आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या बसफेऱ्या सुरू करण्यासाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पठाण यांनी सांगितले. त्याचबरोबर आगाराला नवीन एसटी बसेस मिळाव्यात, यासाठीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी लावून धरली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवाशांची संख्या, स्थानिक गरजा आणि उपलब्ध संसाधने यांचा समतोल साधत यावल आगाराची सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सुलभ बससेवा मिळावी, यासाठी कर्मचारीवर्गाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


Protected Content

Play sound