यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात विविध ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १२ ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विकासकामांवर मोठा परिणाम होत आहे. तालुक्यात एकूण ८३ ग्रामपंचायती असून, प्रशासकीय कामाचा भार सध्या कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांवर येत आहे. एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शासनाकडून ग्रामीण विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ग्रामसेवकांची नेमणूक केलेली आहे. मात्र, यावल तालुक्यात ग्रामपंचायतींची संख्या अधिक असूनही ग्रामसेवकांची सुमारे १० ते १२ पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण प्रशासकीय कामांवर दबाव येत आहे.
मार्च महिन्यात झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये यावल पंचायत समिती अंतर्गत बोरखेडा खुर्दच्या ग्रामसेविका रजिया तडवी, हिंगोणाचे गणेश सुरळकर, कासव्याचे प्रवीण कोळी, साकळीचे चंदू सावकारे, दुसखेड्याचे नितीन महाजन आणि पाडळसा ग्रामपंचायतचे छत्रपाल वाघमारे यांची बदली झाली आहे. या बदल्यांमुळे रिक्त पदांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. बदली झालेल्या सहा ग्रामपंचायतींपैकी केवळ बोरखेडा खुर्द येथे कैलास मोरे नावाचे ग्रामसेवक रुजू झाले आहेत, तर उर्वरित पाच ग्रामपंचायतींची ग्रामसेवक पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे आता यावल तालुक्यात ग्रामसेवकांच्या रिक्त जागांची संख्या १२ वर पोहोचली आहे.
ग्रामसेवकांच्या कमतरतेमुळे ग्रामीण भागातील विकास योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. गावांच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या गंभीर विषयावर लक्ष देऊन रिक्त पदे तातडीने भरावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.