गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १० वी आणि १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच नवोदय विद्यालयात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुती हार आणि महात्मा गांधी यांची मूर्ती देऊन गौरविण्यात आले.

या सत्कार समारंभादरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कौतुकामुळे त्यांचे मनोबल वाढले असून, पुढील शैक्षणिक प्रवासात अधिक चांगले यश मिळवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.