यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल चोपडा राज्य महामार्गावर यावल शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर वढोदे गावाजवळ अज्ञात मोटर वाहनाच्या धडकेत एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी, अंदाजे रात्रीच्या सुमारास यावल चोपडा राज्य महामार्गावरील बेहडे यांच्या कृषी केंद्राजवळ हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गंभीर जखमी अवस्थेतील अज्ञात व्यक्तीला यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या संदर्भात वढोदे येथील रहिवासी मुकुंद बहादूर बारेला यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन आणि अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.