Home क्राईम बंद घरातील घरफोडी प्रकरणी तिघांना अटक ; २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बंद घरातील घरफोडी प्रकरणी तिघांना अटक ; २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या बंद घरातील घरफोडीचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला चांदीचे देव, गॅस हंडी तसेच पितळी व तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील नेहरू नगर परिसरात राहणारे फिर्यादी गोविंद रामदास पाटील हे त्यांच्या पत्नीसमवेत नातवंडांच्या अपघातामुळे त्यांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांनी दिनांक ८ जून २०२६ रोजी घराला कुलूप लावून प्रवास केला होता. दरम्यान, २० जून २०२६ रोजी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती शेजाऱ्यांनी फोनद्वारे दिली.

माहिती मिळताच गोविंद पाटील हे जळगाव येथे परत आले असता घरात घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील संसारोपयोगी वस्तू तसेच चांदीचे देव चोरीला गेल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५८/२०२६ प्रमाणे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ), ३३१ (३) (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीच्या या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला आवश्यक मार्गदर्शन करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण केले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे चोरी करणाऱ्या संशयितांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी २२ जून २०२६ रोजी जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शाहरुख शहा सिकंदर शहा (वय २४, रा. पंचशील नगर, तांबापुरा, जळगाव), मुकेश राजू परमार (वय २२, रा. गौतम नगर, तांबापुरा, जळगाव) आणि दीपक राजू पाटील (वय २४, रा. पंचशील नगर, तांबापुरा, जळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता आरोपींनी घरफोडी केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (वजन ६० ग्रॅम), ३ हजार रुपये किमतीची एच.पी. कंपनीची लाल रंगाची गॅस हंडी तसेच ५ हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव विभाग नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल बेटे, समकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Protected Content

Play sound