आव्हाणे येथे किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे येथील तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने बेदम मारहाण करून डोक्याला लाकडी दांडा मारून जखमी केल्याची घटना घडली. मारहाण केल्याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील रहिवाशी प्रमोद उर्फ कालू भागवत पाटील (वय-३४) रा. धनगरवाड आव्हाणे हा तरूण खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. काल गुरूवार ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कामावरून त्यांच्या दुचाकीने गावातील मुख्य चौकातून घरी जात असतांना रस्त्याच्या मधोमध आकाश ज्ञानेश्वर शिंदे रा. आव्हाणे ता.जि.जळगाव हा उभा होता. त्याला रस्त्याच्या बाजूला हो असे प्रमोदने सांगितले. याचा राग आकाशला आल्याने प्रमोदची दुचाकी थांबवून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. आकाशने लाकडी दांडक्याने प्रमोदच्या डोक्यात मारहाण केली. यात प्रमोद जखमी झाला. त्याला गावातील तरूणांनी शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमी प्रमोद पाटील यांनी तालुका पोलीसात तक्रार दिली. प्रमोद पाटील यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता संशयित आरोपी आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे करीत आहे. 

 

Protected Content