सारथी संस्थेला एक हजार कोटींची मदत द्या : छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर | राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थला १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

येथे पत्रकारांशी बोलतांना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमची १९ जून रोजी बैठक झाल्यानंतर बोर्ड मिटींग ताबडतोब होणे अपेक्षित होतं, मात्र आता ती १४ जुलै रोजी ही ठरलेली आहे. बोर्ड मिटींगमध्ये १९ जूनचे जे मुद्दे ठरलेले होते, ते परत एकदा अभ्यासले जातील. त्यावर चर्चा केली जाईल आणि पुढील दिशा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर त्यावर लक्ष केंद्रीत करावं, ती म्हणजे आम्ही १ हजार कोटी रुपयांची मागणी केली होती.

ते पुढे म्हणाले की, मलाही कल्पना आहे की हजार कोटी एक वर्षात खर्च करणं, इतकं सोपं नाही. तुम्ही फेज १,२,३ असं करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे. सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावं. जो निधी यांना लागणार आहे सारथीला खर्चासाठी, तो अद्याप अर्थ विभागाकडून आलेले दिसत नाही. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी जी काही मागणी केली असेल, माझ्या अंदाजाप्रमाणे ८०० ते ९०० कोटींची त्यांनी मागणी केली आहे. तरी, लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थ विभागाने यामध्ये लक्ष घालून हा निधी लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून त्यांनी जे ठरवलेलं आहे की, वर्षभरात काय कामं करायची ती मार्गी लागतील. यामुळेच १४ जुलै रोजी होणार्‍या बोर्ड मिटींग नंतर बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतील.

Protected Content