मोदींनी नव्या मंत्र्यांना सांगितली ‘काम की बात’

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदींनी सर्व मंत्र्यांना वक्तशीरपणे आणि न थकता लोकांसाठी काम करण्याचं महत्वही पटवून दिलं. वक्तशीर राहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न  थकता  काम करा अशी त्रिसुत्री मोदींनी  मंत्र्यांना सांगितली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रीमंडळ विस्तारानानंतर दुसऱ्याच दिवशी सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी नवीन मंत्र्यांनी यापूर्वी त्यांना जबबादारी सोपवण्यात आलेल्या मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या नेत्यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. माजी मंत्र्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी ही भेट घ्यावी असं मोदींनी म्हटलं आहे.

 

नवीन मंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्वी ज्यांच्याकडे होती त्यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घ्यावा असं मोदींनी सुचवलं आहे. खास करुन सध्या जे नेते मंत्रीमंडळात नाही पण त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या त्यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला मोदींनी दिला. “जे मंत्री आता मंत्रीमंडळात नाही त्यांनी आपल्या खात्याची जबाबदारी छान संभाळली होती. त्यांनी चांगलं काम केलेलं त्याचा फायदा नवीन मंत्र्यांनी करुन घ्यावा,” असं मोदी म्हणाल्याचं सुत्रांनी  सांगितलं.

 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. कोरोना कालावधीमध्ये व्यवस्थापन करण्यास सरकार अयशस्वी ठरल्याचं यावरुन दिसून येत आहे, हर्ष वर्धन हे अपयशी ठरले असं काँग्रेसने म्हटलं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही बैठक जवळजवळ दोन तास सुरु होती.

 

 

 

नवीन मंत्र्यांनी भरपूर मेहनत घ्यावी आणि लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी सरकारच्या जास्तीत जास्त योजना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात यासाठी कार्यशील रहावं असं मोदींनी नव्या मंत्र्यांना सूचित केलं. “मागील बऱ्याच काळापासून मोदी अशाप्रकारे लोकांसाठी काम करत आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द हा अनुभवामधून आलेला आहे. लोकांबद्दल बांधीलकी ठेऊन पारदर्शक पद्धतीने कारभार करावा, यासाठी मोदी आग्रही आहेत,” असं बैठकीमधील सुत्रांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असून कामांचे स्वरूप समजून घेण्याचा सल्ला मोदींनी नव्या सहकाऱ्यांना दिला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै रोजी सुरू होत असून, नव्या मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयांतर्गत विषयांचा अभ्यास करावा, अशी सूचनाही मोदींनी केल्याचे समजते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या चमूतील बहुतांश मंत्र्यांनी गुरुवारी आपापल्या मंत्रालयाचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, डॉ. भारती पवार यांनी आरोग्य राज्यमंत्री, रावसाहेब दानवे यांनी रेल्वे, कोळसा राज्यमंत्री, भागवत कराड यांनी अर्थ राज्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. नवे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे पदभार हाती घेताच मोदींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदींनी देशातील ‘आयआयटी’ संचालकांशी चर्चाही केली. देशातील विविध तंत्रज्ञान संस्थांमधील संशोधन व विकास कार्याचा मोदींनी आढावा घेतला.

Protected Content