आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचोरा शाळेच्या दर्शनी फलकावर योग संदेश!


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर एक आकर्षक आणि प्रेरणादायी फलक लेखन साकारले आहे. या फलक लेखनातून ‘प्रत्येकाने योग करावा, त्याने आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ होते’ असा सुंदर संदेश देण्यात आला आहे.

कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत नाहीत, तर त्यांच्या माध्यमातून समाजात सामाजिक सलोखा आणि जनजागृती वाढवण्यासाठीही प्रयत्नशील असतात. प्रत्येक सण, उत्सव किंवा महत्त्वाचे सामाजिक विषय घेऊन ते शाळेच्या दर्शनी फलकावर उपयुक्त संदेश देणारे फलक लेखन करत असतात. सध्या शैलेश कुलकर्णी यांचे हे सामाजिक फलक लेखन पाचोरा शहरात आणि समाजात चर्चेचा विषय बनले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना सामाजिक संदेश मिळत असून, त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.