यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला “जिल्हा परिषद आपल्या दारी” हा उपक्रम आता यावल तालुक्यात पोहोचला आहे. या उपक्रमाअंतर्गत सोमवार, २३ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत यावल पंचायत समितीत तालुका स्तरीय तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेचा उद्देश नागरिकांच्या तक्रारी थेट त्यांच्या गावीच ऐकून घेणे आणि त्यांचे त्वरित निराकरण करणे हा आहे. या सभेला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी स्वतः उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या अडचणी, तक्रारी, मागण्या आणि समस्या थेट ऐकून घेऊन तात्काळ उपाययोजना सुचवणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या कारभारात गतिमानता आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विविध नवउपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. “जिल्हा परिषद आपल्या दारी” हा उपक्रम त्यापैकी एक असून, त्याचा उद्देश म्हणजे लोकांना मुख्यालयात वारंवार यावे लागू नये, वेळ आणि खर्च वाचावा, तसेच त्यांच्या मनस्तापाला पूर्णविराम मिळावा.
या उपक्रमामुळे नागरिकांना स्थानिक स्तरावरच त्यांच्या तक्रारी मांडण्याची आणि अधिकार्यांच्या समोर तातडीने निवारण होण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारीही या माध्यमातून मार्गी लागण्यास मदत होत आहे.
या तक्रार निवारण सभेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, बालकल्याण अधिकारी हेमंत भदाणे, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, समाजकल्याण अधिकारी विनोद चावरिया, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के आदी मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होत असून, या संधीचा लाभ घेण्यासाठी यावल तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.