जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जलसिंचन आणि कृषी विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पाला’ गती मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आमदार अमोल जावळे यांनी ‘केळीचे प्रतीकात्मक सन्मानचिन्ह’ देऊन गौरव केला. यावेळी जिल्ह्यातील जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत, ‘बनाना बेल्ट’च्या समृद्ध भविष्यासाठी या प्रकल्पाचा ठोस पाया घालणारा निर्णय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आले असताना रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचीही विशेष उपस्थिती होती. ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’स महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकार दरम्यान ऐतिहासिक करारातून मान्यता मिळाल्याने, जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेत मोठी भर पडणार आहे, असे सांगण्यात आले.
या प्रकल्पामुळे रावेर, यावल, भुसावळ या तालुक्यांतील शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध होणार असून, केळीच्या शेतीसह इतर पिकांना मोठा फायदा होणार आहे. जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमदार अमोल जावळे यांनी आपल्या भाषणात ‘बनाना बेल्ट’ या संज्ञेची महत्त्वता अधोरेखित करत, जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगितले.
या विशेष प्रसंगी, जिल्ह्यातील पारंपरिक कृषी ओळख असलेल्या केळीच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना गौरवण्यात आले. ‘केळीचे सन्मानचिन्ह’ हे केवळ एक भेटवस्तू नसून जिल्ह्याच्या भावना आणि आशा-आकांक्षा यांचे प्रतीक आहे, असेही आमदार जावळे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, धुळेचे आमदार अनुप अग्रवाल, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, अमळनेरचे आमदार अनिल पाटील तसेच इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याच्या जलविकासाला चालना देणाऱ्या या निर्णयाने आगामी काळात शेती व अर्थकारण दोन्हीही बहरणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.