जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज जळगाव जिल्हा परिषदेला भेट देऊन विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे (प्रेझेंटेशन) माहिती दिली. जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला व बालकल्याण, कृषी आणि पाणीपुरवठा यांसह विविध क्षेत्रांतील प्रगतीची माहितीही विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेताना योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समन्वय, तांत्रिक दक्षता आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.