Home Cities जळगाव भाजपाचा कार्यकर्ता ३६५ दिवस जनतेत कार्यरत राहणारा – आ. सुरेश भोळे

भाजपाचा कार्यकर्ता ३६५ दिवस जनतेत कार्यरत राहणारा – आ. सुरेश भोळे

0
9


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा केवळ निवडणुकांच्या काळात नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस जनतेमध्ये राहून संघटन आणि समाजहिताचे कार्य करणारा असतो. केंद्र व राज्य शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांनी प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी केले. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भाजप जळगाव जिल्हा महानगरतर्फे आयोजित शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांच्या संमेलनात ते बोलत होते.

रविवार, ५ जुलै रोजी जळगाव येथील दापोरेकर मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाच्या प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा गटनेते प्रकाश बालाणी तसेच माजी जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रवादी विचारांचा आणि त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावा घेतला. जम्मू-काश्मीरसाठी त्यांनी दिलेला लढा, त्याग आणि बलिदान यामुळे देशात राष्ट्रभावनेची नवी चेतना निर्माण झाली. कलम ३७० हटविण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या विचारांना खरी आदरांजली वाहिली गेली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ आणि ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी ६ जुलै रोजी जळगाव शहरातील सर्व ३५२ बूथवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले. बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांनी संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहावे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी मजबूत करून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. शुचिता हाडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन चिटणीस भूषण लाडवंजारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला मोर्चाच्या अध्यक्षा नितू परदेशी, चिटणीस सागर पाटील, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound