Home उद्योग पावसाळ्यात तुटलेल्या वीजतारा आणि खांबांपासून सावध राहा ; महावितरणचे नागरिकांना आवाहन

पावसाळ्यात तुटलेल्या वीजतारा आणि खांबांपासून सावध राहा ; महावितरणचे नागरिकांना आवाहन

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. तुटलेल्या वीजतारा, ट्रान्सफॉर्मर, वीजखांब, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किट झालेल्या ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि कोणतीही धोकादायक परिस्थिती आढळल्यास तातडीने महावितरणला माहिती द्यावी, असे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी स्पष्ट केले आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे वीजवाहिन्या तुटणे, वीजखांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत लोंबकळणाऱ्या किंवा जमिनीवर पडलेल्या वीजतारांना कोणत्याही परिस्थितीत स्पर्श करू नये. तसेच ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर किंवा वीजखांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरापासून दूर राहून त्वरित महावितरणला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपांचे स्विचबोर्ड, उघड्या वीजतारा आणि खराब झालेल्या वायरिंगमुळेही अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील तसेच सोसायटी आणि परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घेऊन विद्युत उपकरणांचा वापर करावा, असेही महावितरणने सांगितले आहे.

महावितरणने नागरिकांना विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नयेत, असेही आवाहन केले आहे. पूरस्थितीत नदीकाठच्या आणि सखल भागात विशेष दक्षता घेणे आवश्यक असून, भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली. अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा कोणतीही विद्युत दुर्घटना घडण्याची शक्यता आढळल्यास नागरिकांनी तातडीने महावितरणशी संपर्क साधावा. यासाठी 1912 या ग्राहक सेवा हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच स्थानिक नियंत्रण कक्षाचे 7798120155 (जळगाव मंडल), 7875766763 (धुळे मंडल) आणि 7875554543 (नंदुरबार मंडल) या क्रमांकांवरही माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound