Home Cities जळगाव जळगावात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे SIR विशेष कॅम्प ; हजारो नागरिकांनी...

जळगावात सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे SIR विशेष कॅम्प ; हजारो नागरिकांनी घेतला लाभ

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत मतदार नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी जळगावातील सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे रविवारी विशेष SIR कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या शिबिरात भिलपुरा, इस्लामपुरा आणि बागवान मोहल्ला परिसरातील हजारो नागरिकांनी सहभाग घेत मतदार यादीतील माहिती पडताळणी, मॅपिंग आणि आवश्यक फॉर्म भरण्याचा लाभ घेतला.

रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये भाग क्रमांक ११२, ११३, ११४, ११५, ११६ आणि ११७ मधील मतदारांचे मॅपिंग करण्यात आले. तसेच SIR अंतर्गत आवश्यक अर्ज अचूक पद्धतीने भरून घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपक्रमात बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांना सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या सदस्यांनी सक्रिय सहकार्य केले. नागरिकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य माहिती देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शकपणे पार पडल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना संबोधित करत मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र अधिकार असल्याचे सांगितले. प्रत्येकाने मतदार यादीतील आपली माहिती योग्य प्रकारे पडताळून अचूक फॉर्म भरावेत, तसेच आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि परिसरातील नागरिकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार नोंदणी आणि पडताळणीमध्ये सक्रिय सहभाग घेणे ही देशसेवा आणि समाजसेवाच असल्याचे त्यांनी नमूद करत विशेषतः युवकांनी या अभियानात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांच्यासह नाझीम कुरैशी, शफी ठेकेदार, सलमान मेहबूब, शेख नजिरुद्दीन, अझीम खाटीक, हाजी सलीमुद्दीन, हाजी शकूर बादशाह, अकबर इब्राहिम, मौलाना रफीक रजवी, शेख शाहरुख आणि फाउंडेशनच्या इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound