होय कंगना खरेच बोलली ! : विक्रम गोखले यांनी केले समर्थन

पुणे प्रतिनिधी | भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कंगना राणावत ही खरेच बोलली असल्याचे प्रतिपादन करत अभिनेते विक्रम गोखले यांनी तिचे समर्थन केले आहे. तर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र यावे यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे.

 

पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी कंगना रणावतच्या विधानाचं समर्थन केलं. कंगना म्हणाली की, भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. तिच्या म्हणण्यावर मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही ते म्हणाले.

 

दरम्यान, विक्रम गोखले पुडे म्हणाले की, शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला. मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाहीये. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो, असंही त्यांनी सांगितलं. तर, मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. जाणीवपूर्वक आपआपली डोकी जागेवर ठेवून काम करा. पुन्हा एकदा माझी प्रामाणिक इच्छा आहे. आता जे चाललं आहे त्यातून बाहेर पडून भाजप-शिवसेनेने एकत्रं आले तर फार बरं होईल, असंही ते म्हणाले.

Protected Content