केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसतर्फे जन जागरण अभियान रॅली अन् पथनाट्य (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरोधात जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने टॉवर चौक ते नेहरू पुतळ्यापर्यंत जन जागरण अभियान रॅली काढण्यात आली. यावेळी पंडीत नेहरू यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महागाईविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर टॉवर चौकात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले

 

याबाबत माहिती अशी की, केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे जन जागरण अभियान राबविले जात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही 14 ते 19 नोव्हेंबर 2021 दरम्यान अभियान राबविण्यात येत आहे. आज जिल्हा काँग्रेस भवनात स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील शास्त्री टॉवर चौक ते नेहरू पुतळ्यापर्यंत काँग्रेसतर्फे जन जागरण अभियानाची रॅली काढण्यात आली. याठिकाणी पंडीत नेहरू यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून महागाईविरोधात घोषणाबाजी करण्यात आली

 

केंद्र सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या धोरणाच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावागावात जाऊन जनजागरण अभियान राबविले जाणार आहे. अभियान दरम्यान काँग्रेसची सदस्य नोंदणीही केली जाणार आहे. लोकसभा मतदार संख्येच्या दीडपट अधिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी कलापथक, तरुण-तरुणींचे पथक गावागावात जाऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध लोकांमध्ये जनजागरण करणार आहेत. अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शरद तायडे, पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content