जळगावात राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन

जळगाव प्रतिनिधी । सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त एक दिवसीय राज्यस्तरीय सोळावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन ८ मार्च रोजी भास्कर मार्केट परिसरातील जैन संघटनेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. म. सु. पगारे यांची निवड करण्यात आली आहे. तर कथा कादंबरीकार रवींद्र पांढरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. औरंगाबाद येथील लेखिका डॉ. छाया महाजन या समारोपाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. नरसिंह परदेशी, ज्येष्ठ पत्रकार त्र्यंबक कापडे, ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुलकर्णी, राहुल रनाळकर, महावीर बँकेचे अध्यक्ष दलिचंद जैन यांची उपस्थिती असणार आहे.

संमेलन श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रायोजित आहे. संमेलनाच्या कालावधीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, गिरिजा कीर व्यासपीठ, प्रा पुरुषोत्तम पाटील नगर, बाबुराव बागुल प्रवेशद्वार अशी नावे दिलेली आहेत. प्रस्तुत संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलन सर्वांसाठी खुले आहे. रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे अध्यक्ष सतीश जैन, सल्लागार साहेबराव पाटील, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, सचिव डी. बी. महाजन यांनी कळवले आहे.

Protected Content