पाडळसरेच्या कामाला मिळणार गती- आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. ते पाडळसरेच्या दक्षीण काठावर काँक्रिटच्या कामाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, पाडळसरे प्रकल्पाला राज्य सरकार प्रथम प्राधान्य देणार आहे. गेल्या तीन महिन्यात पाडळसरे धरणासाठी अधीक्षक अभियंता, कार्यकारी संचालकांपासून अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडे ८ वेळा बैठक घेतल्याचे फलित म्हणून पाडळसरे धरणाला १३८५ कोटी रुपये मिळतील. तर बोहरे येथील साने गुरुजी उपसा सिंचन योजनेसाठी ११ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात होणार आहे. प्रस्तावित पाच उपसा सिंचन योजनांसाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. तर कपिलेश्‍वर मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी २ कोटी ८६ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या वेळी कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, उप कार्यकारी अभियंता डी. सी. पाटील, उपविभागीय अभियंता व्ही. एस. ठाकूर, व्ही. पी. वडगावकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, रामभाऊ संदानशिव, मनोज पाटील, शिवाजी पाटील, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content