
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील जयश्री रमाकांत पाटील (वय ३४) यांचे नाशिक येथे २१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून त्या पोटाच्या विकाराने त्रस्त होत्या. उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरही त्यांचा त्रास कमी होत नसल्याने त्या मानसिक तणावातून जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाची बातमी पाडळसरे गावात समजताच परिसरात शोककळा पसरली.

जयश्री पाटील यांना गेल्या दोन वर्षांपासून पोटाचा त्रास होता. या आजारावर उपचार सुरू होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतरही त्रास कमी होत नसल्याने त्या चिंतेत होत्या. आजारपणामुळे कुटुंबावर आर्थिक भार पडत असल्याची चिंता त्यांनी जवळच्या महिलांकडे बोलून दाखविल्याचे सांगण्यात येते.
जयश्री यांचे पती रमाकांत भगवान पाटील हे खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होते. २१ ऑक्टोबर रोजी पती कामावर गेल्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यांचा मुलगा शाळेतून घरी परतल्यानंतर घरातील दरवाजा उघडून आत गेला असता त्याला आईबाबतची गंभीर परिस्थिती दिसली. त्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारील महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील महिलांनी तातडीने रमाकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे राहणाऱ्या काकांना याबाबत कळविले आणि पोलिसांनाही माहिती देण्यात आली. संबंधित व्यक्तींनी घटनास्थळी पोहोचून जयश्री यांना रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जयश्री यांच्या चोपडा तालुक्यातील धनवाडी येथील माहेरच्या कुटुंबीयांनी नाशिककडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह पाडळसरे येथे आणण्यात आला. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जयश्री या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातील नागरिकांनीही हळहळ व्यक्त केली. त्यांच्या अकाली निधनामुळे पाडळसरे गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.



