मॅनेजर व कॅशियरचा प्रामाणिकपणा : जास्तीचे ५० हजार केले परत

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नेहमी प्रमाणे एका व्यावसायिकाने बँकेत पैशांचा भरणा केला. मात्र,  ५० हजार रुपये जादा दिल्याचे मॅनेजर व कॅशियर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रामाणिकपणे तात्काळ ते पैसे व्यावसायिकाला परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबदल त्या  व्यावसायिकाने त्यांचा सत्कार करून आभार मानले.

 

विश्वासाचे दुसरे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव अर्बन बँकेचे अधिकारी-कर्मचारी देखील प्रामाणिकपणाचा वसा जोपासत आहेत. ग्राहकांप्रती त्यांच्या प्रामाणिकपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. एका मोठ्या व्यावसायिक ग्राहकाने बँकेत पैसे भरतांना दिलेले अधिकचे तब्बल ५० हजार रुपये बँक मॅनेजर व कॅशियर यांनी परत केल्याची घटना समोर आली आहे. येथील आनंद गॅस एजन्सीचे गोविंदराव अजाबराव देशमुख यांनी काल नेहमीप्रमाणे खामगाव अर्बन बँकेच्या मुख्यशाखेत काही पैशांचा भरणा केला. मात्र त्यांनी स्लीपवर लिहलेल्या पैशांपेक्षा कॅशियरकडे अधिकचे ५० हजार दिले होते. दोनवेळा पैसे मोजल्यानंतर कॅशियर अरुण राऊत यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी लगेच याबाबत बँक मॅनेजर अजय माटे यांना सांगितले. माटे यांनी देखील देशमुख यांनी भरलेली स्लीप व दिलेले पैसे तपासून बघितले असता ५० हजाराचे एक बंडल जास्तीचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी मॅनेजर माटे यांनी गोविंदराव देशमुख यांना कॅबिनमध्ये बोलावून अधिकचे हे ५० हजार त्यांना परत केले. यावेळी सहाय्यक शाखाधिकारी जयंत कुळकर्णी उपस्थित होते. खामगाव अर्बन बँकेतील या पारदर्शक व प्रामाणिक कारभाराबद्दल देशमुख यांनी समाधान व्यक्त करत मॅनेजर माटे व  कॅशियर राऊत यांचा सत्कार केला. तसेच आभार मानले. बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा व प्रबंधक संचालक सुधिर कुळकर्णी यांनी देखील बँक मॅनेजर व कॅशियर यांचे अभिनंदन केले.

Protected Content