जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात येणारा ऐतिहासिक श्री पांडुरंगाचा रथोत्सव यंदा १५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी हा पारंपरिक रथोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून, त्यासाठी मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीकडून पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. विविध कामे युद्धपातळीवर सुरू असून यंदाचा रथोत्सव अधिक सुरक्षित, भव्य आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
रथोत्सवाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून रथ ओढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन नऊ मोगऱ्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यापैकी चिंचेच्या मजबूत लाकडापासून काही नवीन मोगऱ्या तयार करण्यात आल्या असून, उर्वरित मोगऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारंपरिक पद्धतीचा वारसा जपत मजबूत आणि सुरक्षित मोगऱ्यांचा वापर केल्यामुळे रथोत्सव अधिक सुकर आणि सुरक्षितरीत्या पार पडणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.

नवीन तयार करण्यात आलेल्या मोगऱ्यांची पाहणी श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष संजय वाणी, ज्येष्ठ मोगरी लावणारे स्वयंसेवक पुरुषोत्तम सोमाणी, विजय कुंभार, राकेश वाणी, गौरव बुंधे तसेच संस्थेचे सचिव रुपेश विलास वाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी रथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, स्वयंसेवकांची जबाबदारी आणि इतर तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पिंप्राळा येथील श्री पांडुरंगाचा रथोत्सव हा जळगाव शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. यंदा १५१ व्या वर्षात प्रवेश करत असलेल्या या रथोत्सवाबाबत भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणात उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या ऐतिहासिक रथोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री पांडुरंगाचे दर्शन घ्यावे आणि धार्मिक परंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर संस्थान आणि रथोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. रथोत्सव समितीचे प्रमुख अनिल वाणी यांनी ही माहिती देताना सांगितले की, रथोत्सवाचे सर्व नियोजन अंतिम टप्प्यात असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. १५१ वर्षांची परंपरा जपत यंदाचा रथोत्सवही भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.



