भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) आयोजित कार्यकर्ता संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनात विविध रेल्वे विभागांतील शेकडो कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान ७० रेल्वे कर्मचाऱ्यांनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघात प्रवेश करत संघटनेवर विश्वास व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आलेली भव्य मिरवणूक आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र हॉल येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनासाठी मुख्यालयातून जनरल सेक्रेटरी अनिल कुमार दुबे, कार्यकारी अध्यक्ष व्ही. के. सावंत, संयुक्त महामंत्री धर्मेश करदम तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजीव कुमार दुबे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. प्रवीण बाजपेई यांच्या भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमनानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर दुपारी सुमारे तीन वाजता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या मंडळ कार्यालयापासून कृष्णचंद्र हॉलपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी आणि उत्साहामुळे परिसरात संघटनात्मक वातावरण निर्माण झाले. कृष्णचंद्र हॉलमध्ये औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संमेलनात अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेई यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, त्या सोडविण्यासाठी संघटनेकडून सुरू असलेले प्रयत्न तसेच NFIR स्तरावर होत असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेची कार्यपद्धती, कर्मचारी हितासाठी सुरू असलेले उपक्रम आणि भविष्यातील संघटनात्मक धोरण याविषयीही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमात NRMU मधील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ECC सोसायटीचे प्रतिनिधींनी सेंट्रल रेल्वे मजदूर संघात प्रवेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या सुमारे ७० कर्मचाऱ्यांनी CRMS ची सदस्यता स्वीकारून कर्मचारी हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची तसेच संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी तन, मन आणि धनाने योगदान देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भुसावळ मंडळ सचिव एस. बी. पाटील, मंडळ सचिव (कारखाना) किशोर कोलते, मंडळ समन्वयक दिपक शर्मा, मंडळ कोषाध्यक्ष एस. के. दुबे, मंडळ कार्यकारी अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, सहायक महामंत्री डी. के. पटसारिया, मंडळ संघटक गणेश सिंह, मुख्यालय उपाध्यक्ष अलका चौधरी, मंडळ महिला अध्यक्षा कल्पना भालेराव, मंडळ महिला सचिव मंगला मोटे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यकर्ता संमेलनाला सुमारे ३०० ते ४०० कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी उपस्थित राहिल्याने संघटनेची ताकद आणि एकजूट अधोरेखित झाली. नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे भुसावळ विभागात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



