सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बीएलओ (Booth Level Officer) बैठकीदरम्यान खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे हिंसक रूप धारण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादात एका २६ वर्षीय तरुणावर लोखंडी फावड्याच्या दांड्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईनखान मोहसिनखान (वय २६, रा. मदिना नगर, सावदा) हे शनिवारी (११ जुलै) दुपारी बीएलओ बैठकीसाठी सावदा येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात उपस्थित होते. बैठकीदरम्यान खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून त्यांचा काही व्यक्तींशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच या वादाचे रूप हाणामारीत बदलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, मनीष यशवंत भंगाळे, सचिन चुडामन बन्हाटे आणि गणेश राजू माळी (सर्व रा. सावदा) यांनी संगनमताने फिर्यादीला मारहाण केली. त्यापैकी एका आरोपीने हातातील लोखंडी फावड्याच्या दांड्याने फिर्यादीच्या डोळ्यावरील कपाळावर वार करून दुखापत केली. दुसऱ्या आरोपीने त्याच फावड्याने डाव्या हातावर मारहाण केली, तर तिसऱ्या आरोपीने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर जखमी तरुणाने सावदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा क्रमांक १७९/२०२६ नोंदवत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून संबंधितांकडून अधिक माहिती संकलित करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील करीत आहेत. घटनेमागील नेमके कारण, उपस्थित साक्षीदारांचे जबाब तसेच इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



