Home धर्म-समाज तामसवाडीतील लग्न सोहळ्यात सामाजिक विचारवंतांच्या पुस्तकांचे वाटप

तामसवाडीतील लग्न सोहळ्यात सामाजिक विचारवंतांच्या पुस्तकांचे वाटप

0
13

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आजच्या आधुनिक काळात विवाह समारंभात महागड्या भेटवस्तू, स्मृतिचिन्हे किंवा शोभेच्या वस्तू देण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील एका विवाह सोहळ्यात समाजाला सकारात्मक संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. तामसवाडी हायस्कूलचे पर्यवेक्षक एम. वाय. लिंगायत यांनी आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांना सामाजिक विचारवंतांची पुस्तके भेट देत समाजप्रबोधनाचा आदर्श घालून दिला. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तामसवाडी येथील श्री. एम. वाय. लिंगायत यांची कन्या कु. पियूषा हिचा विवाह एरंडोल येथील प्रा. एस. टी. वाघ यांचे सुपुत्र चि. हर्षल यांच्याशी नुकताच धुळे येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार, मान्यवर आणि पाहुण्यांना विविध सामाजिक विचारवंतांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके भेटस्वरूपात देण्यात आली. या उपक्रमातून “विचारांची भेट हीच सर्वश्रेष्ठ भेट” हा प्रभावी संदेश देण्यात आला. या प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच अन्य समाजसुधारकांच्या विचारांवर आधारित पुस्तके पाहुण्यांना भेट देण्यात आली. या पुस्तकांच्या माध्यमातून समता, बंधुता, शिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी श्री. एम. वाय. लिंगायत यांनी सांगितले की, विवाह हा केवळ दोन कुटुंबांचा आनंदाचा सोहळा नसून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे प्रभावी व्यासपीठही ठरू शकतो. युवकांनी महान विचारवंतांचे साहित्य वाचून त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, समाजात वाचन संस्कृती वाढावी आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी या अभिनव उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. पारंपरिक भेटवस्तूंऐवजी ज्ञान, विचार आणि प्रेरणा देणारी पुस्तके भेट म्हणून देण्याची संकल्पना अनेकांना भावली. समाजात उत्सव आणि समारंभांमधून सामाजिक जाणीव जागृत करणारे उपक्रम अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले. या विवाह सोहळ्यास माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी सरपंच हिरामण पाटील, समाजभूषण पांडुरंग विसावे, शिक्षक नेत्या शुभांगीताई पाटील, डॉ. निशा महाजन, डॉ. सुशील महाजन, सभापती वंदनाताई थोरात, तहसीलदार पंकज पवार, पिरन अनुष्ठान, रावसाहेब भोसले, शिवाजी पवार, अनिल पाटील, प्रमोद पवार, नगरसेवक छोटुभाऊ थोरात, शिरीषकुमार धनगड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound