यावलचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना लाच घेतांना अटक

यावल प्रतिनिधी | येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना कंत्राटदाराकडून लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केली. साठवण बंधार्‍याच्या कामांसाठी एका कंत्राटदाराला काम मिळवून देण्यासाठी मुख्याधिकार्‍यांनी लाच मागितली होती. यामुळे संबंधीत कंत्राटदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची खातरजमा करून एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने आज दुपारी एक वाजेच्या सुमारास यावल येथील नगरपालिकेत सापळा रचला. यात मुख्याधिकारी बबन तडवी ह २८ हजार रूपयांची लाच घेतांना अडकले. त्यांना या पथकाने रंगेहात अटक केली. अटक करताच त्यांना घेऊन पथक जळगावकडे रवाना झाले. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या या कारवाईमुळे नगरपालिका परिसर अक्षरश: हादरला. यानंतर पथक बबन तडवी यांना घेऊन रवाना झाल्यानंतर याच घटनेचे चर्वण सुरू झाले आहे.

मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर आधी देखील अनेकदा आरोप करण्यात आले होते. बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र आज थेट त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई केल्याने तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या अटकेचा संबंध नगरपालिकेतील राजकीय वादाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Protected Content