रेल्वे मंडळ सल्लागार समिती सदस्यपदी यशवंत जासुद यांची निवड!


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोविंद जासुद यांची मध्य रेल्वेच्या रेल्वे मंडळ सल्लागार समिती (DRUCC) सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

दोन वर्षांसाठी निवड; मान्यवरांकडून अभिनंदन
जासुद यांची ही निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, त्यांना रेल्वे विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. बी. तपस्वी यांच्याकडून या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल रावेर-यावलचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तालुका अध्यक्ष मुकेश येवले, अतुल सोनवणे, धुळे (जिल्हाध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, विजय पाटील, बोदडे नाना, डॉ. कुंदन फेगडे, भगतसिंग पाटील, भाजपचे उमेश फेगडे, डॉ. हेमंत येवले, हेमराज फेगडे, निंबा मराठे (धुळे), देवकांत पाटील, शरद कोळी, जगदीश कवडीवाले आणि अरुण लोखंडे, गणेश महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध
यशवंत जासुद यांची ही निवड मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे महासचिव उमेश महाडिक (मुंबई), मंडळ सचिव विकास सोनवणे (भुसावळ), मंडळ अध्यक्ष अरविंद बाजपेयी (भुसावळ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विशेष सहकार्याने झाली आहे. या निवडीबद्दल जासुद यांनी सांगितले की, “येणाऱ्या काळात रेल्वे प्रवास आनंददायी आणि सुखाचा कसा होईल यासाठी मी प्रयत्न करेन. प्रवाशांच्या समस्या रेल्वे विभागापर्यंत पोहोचवून मला दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडेन. रेल्वेच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी चांगले काम करून प्रवाशांच्या हिताचे प्रश्न मांडून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देईन.”

प्रवाशांना समस्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन
जासुद यांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वे सेवा आणि प्रवासी सुविधांसंबंधित काही समस्या असल्यास, त्या यशवंत गोविंदराव जासुद, श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर, यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव या पत्त्यावर लेखी स्वरूपात सादर कराव्यात. त्यांच्या निवडीमुळे यावल परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.